२१ जून हाच योग दिवस असण्याचे कारण ....!
आंतरराष्ट्रीय योग दिवस हा २१ जूनला साजरा करण्यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी दोन्हीही कारणे आहेत. खगोलशास्त्र असे सांगते की सूर्याच्या दोन स्थिती असतात. उत्तरायण आणि दक्षिणायन. जून महिन्याच्या २१ तारखेला सूर्य आपली स्थिती बदलतो म्हणजेच उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. हा एक नैसर्गिक बदल आहे. जेव्हा सूर्याचे दक्षिणायन सुरू होते तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता कमी होते. यामुळे वातावरणात बदल होऊ लागतो.
याने अनेक रोगांचे आणि आजारांचे उगमस्थान असलेले जीवजंतू, सूक्ष्मजीव आपलं काम करायला सुरुवात करतात आणि माणसं आजारी पडण्याचे प्रमाण वाढायला सुरुवात होते.
योगासनांचा आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे आपल्या शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे. याच कारणाने या वातावरणीय बदलाचा पहिला दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जूनला साजरा केला जातो.तसेच हा दिवस वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो आणि योगासने ही माणसाला दीर्घायुष्याचा लाभ मिळवून देऊ शकतात अशी धारणा आणि विश्वास असल्याने हा दिवस योग दिवस म्हणून निवडला गेला.
विश्व योग दिवसाची उद्दिष्टे:
◆ योगाभ्यासाच्या अद्भुत आणि प्राकृतिक फायद्यांबद्दल लोकांना माहिती उपलब्ध करुन देणे.
◆ योगाच्या माध्यमातून लोकांना ध्यानधारणेची सवय लावणे.
◆ योगसाधनेच्या फायद्यांबद्दल संपूर्ण जगातील माणसांचे लक्ष वेधून घेऊन लोकांमधील दुर्धर आजारांचे प्रमाण कमी करणे.
◆आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आरोग्यासाठी एक दिवस काढून जनसमुदायाला एकमेकांच्या जवळ आणणे.
◆ संपूर्ण विश्वामध्ये वृद्धी, विकास आणि शांती याचा प्रसार करणे.
◆ लोकांमध्ये वैश्विक बंधुभाव जागवणे.
◆ योगाभ्यासद्वारे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करणे.
◆ लोकांना शारीरिक आणि मानसिक आजाराबद्दल जागरूक करणे आणि योगाच्या माध्यमातून त्यावर उपाय शोधणे.
◆ मानसिक स्वास्थ्य जपून दीर्घकालीन स्वास्थ्य प्राप्त करणे.
◆ योगाभ्यासातून लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा अनुभव देणे.
Post a Comment