गौरीपूजन हा महाराष्ट्रातील सण आहे.यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपपल्याकुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरी बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मी पूजन करतात व महानैवेद्य दाखवितात.मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात.
नावे
गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि जेव्हा ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून ज्येष्ठा गौरी असेही म्हणतात.
प्रथेचा प्रारंभ आणि इतिहास
हिंदू देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो.अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे.लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरातशिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या पायाशी एक घोरपडदाखवली आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे.
संस्कृती आणि परंपरा
व्रतवैकल्ये आणि सणावारांना घेऊन येणारा श्रावण जाताजाता भाद्रपदाच्या आगमनाची वार्ता देऊन जातो. श्रावण आणि भाद्रपद या दोन महिन्यांशी स्त्रियांचे खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. माहेरवाशिणींचे तर खास आहे; कारण या महिन्यांत त्यांची माहेरच्या माणसांशी भेट होते; माहेरी जाणे होते.
भाद्रपद महिन्यात घरातील गृहलक्ष्मीने आपल्या घरातील सुखासमाधनासाठी व भरभराटीसाठी विविध पूजा, व्रते आणि काही नवीन संकल्प करण्याची पद्धत आजही चालू आहे. हरतालिका, गणपती स्थापनेनंतर सहाव्या दिवशी येणारा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजे ज्येष्ठा गौरींचे आगमन. या सणाच्या तयारीसाठी होणार्या धावपळीत आणि दगदगीतसुद्धा स्त्रियांच्या चेहर्यांवर एक प्रकारचा आनंद व समाधान असते.
भाद्रपदात येणारी ही ज्येष्ठागौरी आपल्या माहेरी माहेरपणाला आलेली असते. गौरींच्या आगमनापूर्वी पारंपरिक पद्धतीने त्यांच्या स्वागताची तयारी घरांघरांत झालेली असते. महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा-कनिष्ठा, सखी-पार्वती अशा जोडीने त्यांना घरात आणण्याची पद्धत आहे.
गौरींच्या मूर्ति-मांडणीच्या परंपरा
गौरी ही गोधासना, चार हात, तीन डोळे, आणि आभूषणांनी युक्त असावी असे म्हटले आहे.
स्थळपरत्वे गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलेल्या आहेत.. कोणाकडे गौरींचे मुखवटे असतात, तर काही ठिकाणी परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच खडे आणून त्यांची पूजा करतात.
काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात.
काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात.
बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटच्या कोथळ्या मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. . सुपांत धान्याची रास ठेऊन त्यावर मुखवटा ठेवतात.
गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात.
तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रोपे मुळासकट आणली जातात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले असतात असा समज आहे.
आजच्या रेडिमेडच्या जमान्यात गौरीसुद्धा बाजारात रेडिमेड मिळतात. नवीन साड्यांनी नटलेल्या या गौरी मॉडर्न असतात.
अशा विविध रूपात अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी/महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात.
गौरी आवाहन
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर परंपरेप्रमाने गौरी आणल्या जातात. कोकणात नदीच्या काठी जाऊन सुवासिनी व कुमारिका ५,७,११ असे खडे निवडतात. ते स्वच्छ धुवून त्याचे पूजन, आरती करून ते घरात मिरवीत आणतात. याला खड्याच्या गौरी असे म्हणतात. काही कुटुंबात गौरीचे पितळी वा मातीचे मुखवटे स्थापन करतात. घराच्या उंबर्यातून ते आत आणताना त्यांचे पूजन केले जाते. जिच्या हातात गौरी असतील तिचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिकही काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमच्याने वाजवत आवाज केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना केली जाते.
गौरींची पूजा
दुसर्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी गौरींची/महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी शास्त्रानुसार मोठी पूजा, व आरती करतात. त्या दिवशी पूजेला शेवंतीच्या फुलांचे खूप महत्त्व आहे. शेवंतीच्या फुलांचा हार गौरीच्या गळ्यात घालतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो..ह्या दिवशी गौरींचा/महालक्ष्मींचा पाहुणचार असतो स्त्रियांना त्यांच्यासाठी कुठला पदार्थ करू आणि कुठला नको असे होते. नैवेद्यात शेगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. दिवेफळ ठेवतात त्यात तुपातील वाती लावतात.
अशा प्रकारे ह्या दिवशीची पूजा पार पाडली जाते. ह्या दिवशी गौरींच्या/महालक्ष्मींच्या चेहर्यांवर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो, असे बायकांना वाटते. जरी ते मुखवटे मातीचे,शाडूचे किंवा पितळेचे असले तरी त्यांच्या चेहर्यांवरील आनंद, त्यांच्या डोळ्यांत दिसणारी चमक काही औरच असते.
विसर्जन
तिसर्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन केले जाते. त्या दिवशी सकाळी पाच सवाष्णींना किंवा घरच्याच लोकांना जमवून पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात, त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी बायकांचा हळदीकुंकुवाचा कार्यक्रम ठेवलेला असतो. त्या निमित्ताने सर्वांच्या घरातील महालक्ष्मींचे दर्शन होते.
तिसर्या दिवशी गौरींच्या/ महालक्ष्मींच्या चेहर्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. कारण या माहेरवासिणी आपल्या माहेरून सासरी जात असतात. गौरींना निरोप देण्याची वेळ जस जशी जवळ येते तशी घरातील मंडळींची हुरहूर वाढत जाते.
रात्री पंचांग वेळ पाहून गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते.
www.shikshansanjivani.com
Post a Comment