0
॥ संत सेना महाराज ॥ 
. . . . . . . . . संकलन :- संजय जगताप (एम्.फिल्. , पुणे विद्यापीठ शिक्षण शास्त्र विभाग ) 
मध्यप्रदेशातील बांधवगड संस्थानातील ईरची या गावी महाराजांचा जंन्म झाला. सेना महाराजांचे वडील देविदास बांधवगडच्या राजाकडे नाभिकाचे काम करीत असत. आई प्रेमकुंवरबाई सात्विक स्वभावाची गृहिणी होती. वडील देविदासानंतर परंपरेनुसार राजाकडील नाभिकाचे काम सेना महाराजांकडे आले. सेना महाराजांचा लहानपणापासूनच भक्तीमार्गाकडे ओढा होता. त्यांच्या हिंदी मातृभाषेतून ते भक्तीरचना सुध्दा करु लागले. कालांतराने महाराष्ट्र्रातील त्या काळच्या संतांची माहिती सेना महाराजांना मिळाली. त्या संतांच्या व पंढरपूरच्या विठ्ठल भेटीसाठी ते आतूर झाले. तिर्थयात्रा करित करीत ते इकडे आले संत निवृत्तीवरनाथ, संत ज्ञानेश्र्वर, संत नामदेव व इतर त्यांचे समकालीन संत होते. या महान संतांच्या सान्निध्यात येऊन ते महाराष्ट्र्राच्या पावनभूमीत रममाण झाले.

त्यांनी मराठी भाषा आत्मसात करुन मराठी भाषेवर इतके प्रभूत्व मिळविले की मराठी भाषेत त्यांनी अनेक उत्कृष्ट अभंगांची निर्मिती केली. भागवंत संप्रदायातील वारकरी भक्तीरसात त्यांनी स्वत:ला झोकून दिले.

एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्ितरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुध्दा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्र्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरुन सिध्द होते.

चमत्कारांनी साधुसंतांचे मोठेपण दर्शविणार्‍या लोकांना खोडच जडलेली आहे. ज्ञानेश्र्वरांनी भिंत चालविली, रेडयाच्या तोंडून वेद म्हणवून घेतले. अशा प्रकारच्या अनेक दंतकथा ज्याप्रमाणे अनेक संतांच्या बाबतीत सांगितल्या जातात तशीच दंतकथा सेना महाराजांच्या बाबतीतही सांगितली जाते. राजाची हजामत करण्यासाठी राजाचा माणूस सेना न्हाव्याकडे निरोप सांगावयास जातो. परंतु भगवंताच्या नामस्मरणात दंग असलेल्या सेना न्हाव्याला निरोप ऐकू जात नाही. उशीर झाल्यामुळे राजा क्रोधीत होऊन सेना न्हाव्याला शिक्षा होईल म्हणून स्वत: भगवंतच धोपटी घेऊन राजाची हजामत करुन जातात.

नामदेव, तुकाराम, सेना न्हावी, गोरा कुंभार, चोखामेळा अशा अनेक संतांनी त्यांच्या अभंगवाणीतून समाज प्रबोधन केले. संसारात राहून सुध्दा ईश्र्वर भक्ती करुन परमार्थ साधला जाऊ शकतो हे लोकांना सांगितले. कर्मठ उच्चवर्णियांनी निर्माण केलेली उच्चनीच, जातीभेद ही परंपरा मोडीत काढण्यासाठी उपदेश केला. स्वत:ही तसे वागले. त्यांनी निर्माण केलेले काव्य, अभंग, यांचाच जनतेवर इतका प्रचंड प्रभाव पडला की इतर काही चमत्कारांनी त्यांचे मोठेपण सिध्द करण्याची काहीच गरज नसावी.

नंतर महाराष्ट्र्रातील वास्तव्य संपवून सेना महाराज पुन्हा त्यांच्या जन्मभूमीस तीर्थाटन करीत निघून गेले. त्यांच्या हिंदी भक्तीरचना उत्तरेकडील सर्व हिंदी प्रदेशातून म्हटल्या जातात. महाराजांनी काही रचना पंजाबी भाषेत सुध्दा केल्या आहेत

Post a Comment

 
Top